महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी पिरंगुट ग्रामपंचायतीच्या वतीने महिला महा आरोग्य तपासणी व अॅनिमिया (रक्तक्षय) निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विविध वयोगटातील महिलांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच हिमोग्लोबिन तपासणीद्वारे अॅनिमियाचे निदान करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी महिलांना संतुलित आहार, पोषणमूल्ये आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
अनिमियासारख्या समस्येचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार व सल्ला मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरादरम्यान महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूक करण्यात आले तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत सजगता निर्माण झाली असून त्यांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व तपासणीची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाली.


